सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला बोल्हेगावातील भीम जयंती सोहळा

अहिल्यानगर | २० एप्रिल २०२६

बोल्हेगाव येथे ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय भीम जयंती सोहळ्याचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमात संविधान जागर, पारंपारिक वाद्यांच्या गजरात सांस्कृतिक कार्यक्रम, भीम गीतांची मेजवानी आणि विचारप्रवर्तक व्याख्यानांनी उपस्थितांना भारावून टाकले.

या कार्यक्रमात जेष्ठ आंबेडकरवादी नेते अशोक गायकवाड, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, महापालिका पाणी पुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम, तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच जयंती मिरवणुकीत लेझिम पथकात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कु. ज्योती राजेश सकट यांची धर्मदाय आयुक्त निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला, तर प्रांजली पंकज लोखंडे हिचा मंथन परीक्षेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सादर झालेल्या भीम गीतांनी वातावरण भारावून गेले. कामगार नेते कॉ. अनंत लोखंडे यांनीही गीत सादर करून रंगत वाढवली. विठ्ठल उमाप यांनी मार्गदर्शन करत समाजातील एकात्मता आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. चिमुकल्या प्रफुल्ल लोखंडे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले.

प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष पंकज लोखंडे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आपण समानतेने उभे आहोत. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हा आमचा उद्देश आहे.”

जेष्ठ नेते अशोक गायकवाड म्हणाले, “संविधान हे आपल्या देशाचे बळ आहे. न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आजच्या पिढीने बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे.”

नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण झाली तर ते भविष्यात जबाबदार नागरिक बनतील. ज्ञानदीप फाउंडेशनचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.”

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदीप फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.

 

नवीन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!