केडगाव दगडफेक प्रकरणात अनिलभैय्या राठोडांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

अहिल्यानगर | 26 मे 2026

केडगाव येथे 7 एप्रिल 2018 रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर उसळलेल्या दगडफेक आणि रास्तारोको प्रकरणात माजी आमदार स्व. अनिलभैय्या राठोड यांच्यासह सर्व आरोपींची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल सात वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला असून, पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना दिलासा दिला.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर संतप्त जमावाने दगडफेक, रास्तारोको, शिवीगाळ तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप ठेवत कोतवाली पोलिस ठाण्यात सुमारे 600 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात तत्कालीन शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांचाही समावेश करण्यात आला होता.

सुरुवातीला पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप ठेवला होता. मात्र पुढील तपासात हे कलम वगळून इतर कमी गंभीर कलमे लावण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षाला आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश तायडे यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या निकालानंतर शिवसैनिकांनी समाधान व्यक्त करत जल्लोष केला. शिवसेनेच्या वतीने ॲड. शशिकांत रकटे, ॲड. महेश तवले आणि ॲड. डापसे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!