अहिल्यानगर | २७ एप्रिल २०२६
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे भरदिवसा झालेल्या नितीन शिरसाठ यांच्या निर्घृण हत्याकांडाला आता ७० पेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही मुख्य आरोपी मोकाट असल्याने शिरसाठ कुटुंबात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी शिरसाठ कुटुंबातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
१२ फेब्रुवारी रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल परिसरात नितीन शिरसाठ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता, पण पोलिसांनी अजूनही ठोस कारवाई केलेली नाही. या गुन्ह्यातील आरोपी ‘फुलमाळी टोळी’शी संबंधित असल्याचे बोलले जात असून, त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
