अहिल्यानगर | २० एप्रिल २०२६
अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनसमोरील मनमाड रोड ते निसर्गनगर, रिंगरोड या महत्त्वाच्या मार्गास वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ अहिलाजी भिंगारदिवे यांचे नाव देण्याची जोरदार मागणी सकल भारतीय समाज व देशप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे व महापौर ज्योती अमोल गाडे यांना ठराव मंजुरीसाठी निवेदन देण्यात आले. येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून संबंधित रस्त्याचे नामकरण मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी प्रथम विरोधी पक्षनेते भैरवनाथ वाकळे, युनूसभाई तांबटकर, इंजि. अभिजीत वाघ, संध्या मेढे, असिफखान दुलेखान, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
मागणीपत्रात नमूद केल्याप्रमाणे,अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण असलेले हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांनी १९६५ च्या भारत-पाक युद्धात कच्छच्या रणातील ‘सरदार पोस्ट’ येथे अद्वितीय शौर्य दाखवले. भीषण गोळीबार आणि सुरुंगांच्या धोक्यात त्यांनी जखमी सहकाऱ्याला सुरक्षित स्थळी आणून त्याचा जीव वाचवला. हा पराक्रम त्यांनी २० एप्रिल १९६५ रोजी पहाटे केला होता. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्याबद्दल भारतीय लष्कराने त्यांना ‘वीरचक्र’ सन्मान प्रदान केला.
