एमआयडीसीत कायद्याचा बडगा; गुन्हेगारी विरोधात धडक मोहीम

अहिल्यानगर | २२ फेब्रुवारी २०२६

अहिल्यानगर एमआयडीसी परिसरातील खंडणी, दहशत व धमकावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून थेट आणि कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला. आमी संघटनेच्या बैठकीत त्यांनी गुन्हेगारीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण जाहीर करत, गरज पडल्यास थेट ऑपरेशन राबविण्याचे स्पष्ट संकेत दिले.

बैठकीदरम्यान काही उद्योगपतींनी एका खंडणीखोराकडून होत असलेल्या त्रासाची माहिती मांडली. संबंधित व्यक्तीने उद्योगात येऊन कामकाज ठप्प केल्यासोबतच रात्री घरी जाऊन कुटुंबीयांना धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

“धमकीची भाषा आणि दबावाची पद्धत अजिबात सहन केली जाणार नाही. कोणीही कोणत्याही पक्षाचा असो, कायदा सर्वांसाठी समान आहे. उद्योगपतींनी भीती न बाळगता तक्रार करावी,” — सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलीस अधीक्षक

औद्योगिक वसाहतीत दारू, जुगार, अमली पदार्थ व इतर बेकायदेशीर प्रकारांवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तक्रारींसाठी स्वतंत्र पेटी बसविण्याची घोषणाही करण्यात आली. दरमहा आढावा बैठक घेऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला.

आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी उद्योग क्षेत्रात कोणताही दबाव किंवा खंडणी सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. उद्योजकांवर अन्याय झाल्यास संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष संजय बंदिष्टी यांनी उद्योग वाचवण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) शिरीष वमने, सहाय्यक पोलीस निरीक्षक (एमआयडीसी) माणिक चौधरी, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.

औद्योगिक वातावरण सुरक्षित व गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे सांगत घार्गे यांनी उद्योगपतींना धैर्याने पुढे येण्याचे आवाहन केले.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!