अरुणकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त ‘अन्नछत्रालय’ सुरू; भुकेल्यांसाठी दररोज मोफत भोजन

अहिल्यानगर | २५ मार्च

अहिल्यानगरमधील माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या निधनाला दहा महिने पूर्ण होत असताना त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त एक समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. काका ट्रस्टच्या वतीने ‘स्व. अरुणकाका जगताप अन्नछत्रालय’ सुरू करण्यात आले असून बुधवारी (२५ मार्च) त्याचे उद्घाटन होत आहे.

मार्केटयार्ड परिसरातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयासमोरील नागेश्वर महादेव मंदिर येथे हे अन्नछत्रालय सुरू करण्यात आले आहे. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत येथे गरजू नागरिकांना मोफत भोजन दिले जाणार आहे.

स्व. अरुणकाका जगताप यांचा स्वभावच अन्नदानाचा होता. त्यांच्या घरी किंवा कार्यालयात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवणाचा आग्रह करणे ही त्यांची सवयच होती. ग्रामीण भागातून शहरात आलेले आणि अडचणीत सापडलेले अनेक ग्रामस्थ त्यांच्या घरी जेवून जात असत. त्यांच्या आयुष्यात हे जणू अघोषित अन्नछत्रच चालू होते.

काका स्वतःही खवय्ये होते. मित्रपरिवारात त्यांना जेवायला बोलावणे हा आनंदाचा क्षण मानला जात असे. विविध धर्मीय मित्रांसोबतच्या जेवणाच्या पंगतीतून संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि आपुलकी जपण्याचा त्यांचा छंद होता. कोणत्याही निमित्ताशिवायही ते लोकांसोबत जेवायला बसत असत.

त्यामुळे त्यांच्या नावाने कायमस्वरूपी अन्नछत्र सुरू करणे हा त्यांच्या स्वभावाला साजेसा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. या माध्यमातून काकांच्या अन्नदानाची परंपरा पुढे चालू राहणार असून गरजूंच्या पोटाला दिलासा मिळणार आहे.

नविन बातम्यांसाठी 👉http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!