शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमविरुद्ध सभागृहात संताप; नगरसेवकांकडून हकालपट्टी

अहिल्यानगर | २७ मार्च

अहिल्यानगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध संतप्त भावना पुन्हा एकदा उफाळून आल्या. छिंदम याला सभागृहाबाहेर काढण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटातील नगरसेवक आक्रमक झाले.

सभेच्या सुरुवातीलाच अनेक नगरसेवकांनी छिंदम याच्या आसनाजवळ जाऊन त्याला घेराव घातला. “शिवद्रोही व्यक्तीसोबत आम्ही बसणार नाही” अशा घोषणाबाजीसह त्याला तात्काळ बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या वेळी सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

महापौर ज्योती गाडे आणि आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे नगरसेवकांनी ठराव करण्याची मागणी करत, छिंदम सभागृहात येईल तेव्हा त्याला बाहेर काढण्याचा नियम करण्याचा आग्रह धरला. “तो सभागृहात बसला तर आम्ही सभात्याग करू,” असा इशाराही देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर यांच्यासह सर्वच गटातील नगरसेवक या भूमिकेत एकमताने पुढे आले.

परिस्थिती अधिक चिघळत असताना काही नगरसेवक थेट छिंदम याच्या आसनाजवळ गेले. त्याच्यासमोरील माईक काढून घेण्यात आला आणि त्याला सभागृहाच्या दरवाजापर्यंत नेण्यात आले. अखेर त्याला बाहेर काढल्यानंतरच सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.

दरम्यान, छिंदम याने स्वतःचा बचाव करत “लोकशाहीत प्रत्येकाला सभागृहात बसण्याचा अधिकार आहे,” असा युक्तिवाद केला. मात्र, नगरसेवकांनी हा युक्तिवाद फेटाळून लावत तीव्र विरोध कायम ठेवला.

उल्लेखनीय म्हणजे, छिंदम यांनी यापूर्वी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी ते उपमहापौर पदावर असून भाजपमध्ये होते. या प्रकरणानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि पदाचा राजीनामाही घ्यावा लागला. पुढे त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्यात आले होते. तरीही ते दोनवेळा पुन्हा निवडून आले असून यावेळी ते प्रभाग क्रमांक १० अ मधून बहुजन समाज पक्षाकडून विजयी झाले आहेत

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!