अहिल्यानगर | 21 मार्च 2026
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष ऍसिड हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे संतापाची तीव्र लाट उसळली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे. संबंधित आरोपीला तात्काळ अटक करावी तसेच जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन सादर करत प्रशासनाला जाब विचारला. तसेच येत्या बुधवारपर्यंत आरोपीला अटक झाली नाही, तर सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

या वेळी मयूर कुलथे, प्रमोद बोऱ्हाडे, प्रकाश लोळगे, विजय देवळालीकर, अनिकेत बागडे, आनंद नांदूरकर, राहुल कुलथे, संतोष देडगावकर, वैजनाथ चिंतामणी, विजय कुलथे, प्रकाश हिंगणगावकर, श्याम मुंडलिक, विजय जगदाळे आदींसह अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार जगताप यांनी निवेदनात संताप व्यक्त करत म्हटले की, वडगाव पान येथे सहा वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला होणे ही अत्यंत गंभीर व लज्जास्पद बाब आहे. या घटनेमुळे जिल्ह्याची मान खाली गेली असून यासाठी संबंधित पोलिस यंत्रणा व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे नमूद केले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली असून “खाकीचा धाक” संपल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच अशा विकृत प्रवृत्ती निर्भयपणे गुन्हे करत असल्याचे त्यांनी म्हटले.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रशासनास काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. शाळा व महाविद्यालयांमध्ये नियमित गस्ती पथके नेमणे, त्या पथकांमध्ये महिला पोलिसांचा समावेश करणे, गस्तीची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवणे, शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत विशेष बंदोबस्त ठेवणे आणि कायमस्वरूपी पोलीस नियुक्तीचा विचार करणे या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच या सर्व उपाययोजनांबाबत प्रशासनाने सविस्तर लेखी अहवाल तात्काळ सादर करावा, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
“येत्या बुधवारपर्यंत आरोपीला अटक झाली नाही, तर सराफ सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही.”
नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live.com