अहिल्यानगर | १ एप्रिल २०२६
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या रिक्त जागेसाठी पक्षाने त्यांच्या मुलगा अक्षय कर्डिले यांच्यावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे राहुरीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
भाजपसाठी राहुरी हा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने येथे आपली पकड मजबूत ठेवली होती. त्यामुळे ही जागा कायम राखण्यासाठी पक्षाने घरातीलच उमेदवार पुढे केला आहे. सध्या अक्षय कर्डिले ‘शिव निर्धार यात्रा’च्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही ‘जनआशीर्वाद यात्रा’ सुरू करून मैदानात ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांनी अद्याप निवडणूक लढवण्याबाबत स्पष्ट घोषणा केलेली नाही. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळवला होता आणि नंतर ते ऊर्जामंत्री झाले. मात्र, २०२४ मध्ये शिवाजीराव कर्डिले यांनी दमदार पुनरागमन करत तनपुरे यांना तब्बल ३४ हजार मतांनी पराभूत केले होते. त्यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. सुमारे ६०० कोटींच्या कर्जामुळे हा कारखाना सुरू करण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुरी नगरपालिकेत मात्र प्राजक्त तनपुरे यांनी आपली ताकद कायम ठेवली आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी १७ जागा जिंकत सत्ता राखली आहे. त्यामुळे आगामी पोटनिवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
“राहुरीत यंदाची पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत ठरणार असून कर्डिले विरुद्ध तनपुरे असा थेट सामना होण्याची शक्यता आहे.”
नविन बातम्यांसाठी 👉 ahilyanagar24live.com